क्षण

आयुष्यात काही क्षण असेही यावेत…
आयुष्यात काही क्षण असेही यावेत…
ज्यां क्षणांतच हे जीवन विरूनी जावे…
तुझ्या शोधातच मग फिरुनी जन्मा यावे…
तुझ्या मिठीतच पुन्हा ते क्षण जगावे…
त्या क्षणांतच पुन्हा जीवन विरूनी जावे…

Advertisements

सोबत…

कधीतरी होतो मी ही तुझ्यासोबत…
झाली चुकामूक आडवळणावर…
ना मला दुःख त्याचे तुलाही ते नसावे…
वाटेतल्या सोबतीचे बहुधा हेच भाग्य असावे…

आठवण

अडगळीच्या खोलीतून त्या
मी ती आठवण बाहेर काढली
बरेच दिवस फडताळात बंद असलेली
एक वही बाहेर काढली
उघडली असतील पाने
जेमतेम पहिली पाचच
अचानक त्यातून त्या फुलाची
सुकलेली पाकळी बाहेर पडली…
घेतली हातात हलकेच ती
अजून सुवास तसाच होता
रंग उडाला पुरता तरी अजूनही
तिच्यात आपल्या प्रेमाचा वास होता
घेतला मी एक दीर्घ श्वास
भरून घेतला माझ्यात तो वास
म्हटले स्वतःशीच आता जमेल नक्की
करायला सहज पुढचा प्रवास…
बरे वाटले, भानावरही आलो
पुन्हा झालो सज्ज, पुढे निघालो
कुठेतरी पैंजणांचा आवाज झाला
पुन्हा तुझ्या असण्याचा भास झाला
दचकून चोहीकडे फिरून पाहिले
तू इथे कशी? स्वतःलाच विचारले
त्या वहीची पुढची पाने उलटली
तुझ्या ओल्या मेहेंदिची नक्षी दिसली
तिथली अक्षरं नीट दिसताच नव्हती
मेहेंदीच्या आडून लपून पाहत होती
हातानेच वाचायचा प्रयत्न केला
स्पर्शातूनच अर्थ कळतो का पाहिला
आज कळले ते तेव्हा तुझे असे जाणे
पुन्हा फिरून माघारी कधीही न बघणे
तुझे असे नव्हतेच त्यात खरे काही
तुझी साथ माझ्या नशीबातच नाही
रागातच मग केली ती वही बंद
म्हटले नकोच आता तो कवितांचा छ्न्द
तूच लाविले होतेस मला वेड ज्याचे
बनून बसलेत आता त्याचेच बंध
वाटले वही ती टाकावी फाडून
तुझी आठवणही टाकावी गाडून
उचलली वही ती मी छातीशी कवटाळली
पुन्हा ती आठवण मी त्या फडताळातच कोंडली….

जबाबदारी

कितीही कर्तृत्ववान माणूस झाला आणि एखाद्या क्षणी त्याने स्वतः बद्दलची जबाबदारी मग ती कोणत्याही प्रकारची का असेना, घेण्याचे टाळले की मग त्या गोष्टीची जबाबदारी डोक्यावर घ्यायला आपले म्हणवणारे कितीतरी लोक अचानक तयार होतात आणि मग सुरू होतो त्या माणसाच्या कर्तृत्व ह्रासाचा प्रवास…त्या वेळी अनाहूतपणे नाकारलेल्या त्या जबाबदरीला इतरांनी स्वीकारून त्यांना कोणतीही कल्पना नसताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा स्वीकार करून, ते योग्य मानून आपली अक्कल गहाण ठेवली की मग सगळे जग अशा माणसाला चुकीचे, आपल्या विरुद्ध असल्याचे वाटू लागते अशा वेळेस पूर्वी आपल्याला आधार देणारे आपल्यासाठी त्याग करणारे वगैरे सगळे अचानक तुच्छ आणि स्वार्थी वाटू लागतात आणि मग वेग घेतो तो एका कर्तृत्ववान, यशस्वी माणसाचा अपयशाच्या दिशेने एकतर्फी प्रवास…कदाचित आर्थिक त्रास पूर्व पुण्याईने आणि आधी गाजवलेल्या कर्तृत्वामुळे होणार नाही किंवा कमी होईल पण मानसिक त्रास आणि पुढे येणारे अपयश काही चुकायचे नाही…काहीही झाले तरी माणसाने स्वतःबद्दलच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतःच्या शिरावर घेऊन निर्णय घेणे आणि त्यानुसार वागणे केव्हाही श्रेयस्कर…

…जमलेच नाही

मी थेंबा-थेंबानी दुःख जमवत राहिलो
पण त्याचेही तळे साचलेच नाही
मनाला झालेल्या असंख्य छिद्रांमुळे
एवढेही करणे जमलेच नाही

जमवाजमव मी केली खूप
जुळवून घेण्या सर्वांशी खास
फाटलेल्या माझ्या झोळीत मात्र
कोणालाही राहणे जमलेच नाही

ओढाताण झाली फार
तुझी सर्वांग झाकताना
तोकड्या माझ्या पांघरूणास तर
मलाही झाकणे जमलेच नाही

कसे मानलेस तू ह्यास घर
भकास भिंती नाही छप्पर
उघडया बोडक्या ह्या व्यथेला
संसारही म्हणणे जमलेच नाही

वाहत गेलो काळासोबत
कधी विरुद्ध पोहलोही नाही
फक्त लोकापवादाच्या भीतीने
जीवनही जगणे जमलेच नाही

मी

कधी शोधतो आहे कोणता खरा मी
कधी वाटते आहे एकटा बरा मी

जरी दिसतो असा राकट विचित्र
आतून आहे तसा हळवा जरा मी

घेऊन फिरतो चेहऱ्यावर ते हास्य
आतून दुःखाचा वाहता झरा मी

माझ्या अशा धुंदीचे मी काय करावे?
माझ्या नशेवर जालीम उतारा मी

विचारतेस विखरलिस किती गावे ?
नाहीच गं, इतका वादळी वारा मी

सांगायचे नव्हते तसे तुला काही
उगीच केला तरी तुला इशारा मी

कुठे शोधू ते तुझे नवीन खेळणे
अस्ताव्यस्त पसरला हा पसारा मी

तू स्वतःच उभी होतीस खंबीर
व्यर्थ वाटले तुला तुझा सहारा मी